माझा नवरा माझ्या पैशाला… विनोद कांबळीची अवस्था पाहून पीव्ही सिंधू काय म्हणाली; मोठा खुलासा काय?
विनोद कांबळींच्या आर्थिक आणि आरोग्य समस्यांमुळे अनेकजण त्याला मदत करत आहेत. पीव्ही सिंधूने कांबळींच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना सावध गुंतवणुकीचा सल्ला दिला. सचिन तेंडुलकर यांनीही कांबळीला मोठी आर्थिक मदत केली आहे, याची माहिती समोर आली आहे.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची अवस्था पाहून त्याच्या मदतीला अनेकजण धावून आले आहेत. क्रिकेट जगतासह इतर क्षेत्रातील लोकांनीही विनोद कांबळीसाठी मदतीचा हात पुढे केलेला आहे. विनोद कांबळीची आर्थिक स्थिती नाजूक आहे. शिवाय विनोद आजारीही असल्याने त्याला मदत केली जात आहे. असं असतानाच प्रसिद्ध बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूची प्रतिक्रिया समोर आली आहे.
विनोद कांबळीचा व्हिडीओ पाहून आपण भावूक झालो होतो, असं पीव्ही सिंधूचं म्हणणं आहे. तिने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट कबूल केली आहे. मी कांबळीचा व्हिडीओ पाहिला. खरं तर पैशाची गुंतवणूक केली पाहिजे. आपल्या पैशाचा चांगला विनियोग केला पाहिजे. त्याचा भविष्यात उपयोग होतो. वायफळ खर्च करणं थांबवलं पाहिजे, असा सल्ला पीव्ही सिंधूने दिला आहे.
सिंधूचा सल्ला काय?
तुम्हाला सावधपणे गुंतवणूक केली पाहिजे. जेव्हा तुम्ही टॉप ॲथलिट असता, तेव्हा तुम्हाला प्रचंड पैसा मिळतो. खूप पाठिंबा मिळतो. अशावेळी तुम्ही सावध राहिलं पाहिजे. त्यावेळी तुम्ही कर भरला पाहिजे. नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. माझ्या गुंतवणुकीचं सर्व काही माझे आईवडील पाहतात. माझा नवराही माझा पैसा कुठे गुंतवायचा हे ठरवतात. मला कधीच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला नाही. त्याबद्दल मी आभारीच आहे. तुम्हाला योग्य प्रकारे मार्ग दाखवतील असे लोक तुमच्या आजूबाजूला हवेत, असं पीव्ही सिंधू म्हणाली.
आजारी पडला अन्…
सर्वात आधी रमाकांत आचरेकर यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या एका कोनशिलेच्या लोकार्पण कार्यक्रमात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची भेट झाली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी विनोद कांबळी सचिनला ओळखत नसल्याचं दिसत होतं. यावरून विनोदची तब्येत ठिक नसल्याची जोरदार चर्चा होती. त्यानंतर विनोद कांबळीची मध्यंतरी तब्येत बिघडली होती. त्याला ठाण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्यामुळे त्याची मानसिक आणि शारिरीक स्थिती नाजूक होती. मात्र, त्यावरही मात करून कांबळी बरा झाला. काही दिवसानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं होतं. विनोद कांबळी याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याची माहिती मिळताच कपिल देव, सुनील गावस्कर आणि अजय जडेजासह अनेक क्रिकेटपटूंनी त्याला मदतीचा हात दिला. सचिन तेंडुलकरही त्याला वेळोवेळी मदत करत असतो.
सचिनची भरभरून मदत
विनोद कांबळीला मदत करत नसल्याबद्दल सचिन तेंडुलकरवर सातत्याने टीका होत असते. पण विनोद कांबळीने रुग्णालयातून आल्यावर एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. यावेळी त्याने सचिनने कशी कशी मदत केली याची माहिती दिली होती. सचिनमुळेच माझी दोन ऑपरेशन झाली होती. या ऑपरेशनचा खर्च सचिनने उचलला होता, अशी माहितीही त्याने दिली होती. तर, आमच्या मुलांच्या शाळेची फि सचिनने पाठवली होती. पण मी ती नम्रपणे परत केल्याचं विनोद कांबळीच्या बायकोने म्हटलं होतं. त्यामुळे सचिनवर होणाऱ्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं होतं.