मितालीच्या टीमचा न्यूझीलंडवर विजय, मालिका 2-0 ने खिशात

मितालीच्या टीमचा न्यूझीलंडवर विजय, मालिका 2-0 ने खिशात

वेलिंगटन : भारतीय पुरुष संघाच्या पावलावर पाउल टाकत महिला संघानेही न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. कर्णधार मिताली राजच्या महिला ब्रिगेडने मंगळवारी माउंट माउंगानुईच्या बे-ओवल मैदानावर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला आठ विकेट्सने पराभूत केलं. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघ सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. तर दुसरीकडे याच मैदानावर पुरुष संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली.

न्यूझीलंडने भारतीय संघासमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं होतं. फलंदाज स्मृती मंधाना आणि कर्णधार मिताली राजच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर भारताने विजय खिशात घातला. स्मृतीने या सामन्यात नाबाद 90 तर मिताली राजने नाबाद 63 धावा केल्या.

या विजयासोबतच भारतीय महिला संघाने या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 1 फेब्रुवारीला हेमिल्टन येथे खेळण्यात येणार आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 9 विकेट्सने जिंकला होता. यासोबतच महिला संघाने 2014-16 दरम्यान 1-2 ने न्यूझीलंडकडून मिळालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे.

या विजयानंतर आयसीसी रॅकिंगमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. तर न्यूझीलंड हा तिसऱ्या स्थानावर आहे. यंदाच्या 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद न्यूझीलंडकडे असल्याने त्याला स्पर्धेत सरळ प्रवेश असणार आहे.

भारताने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंड संघ 44.2 षटकातच 161 धावांवर माघारी परतली. यात कर्णधार एमी सॅटर्थवेटने 71 धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघासमोर 162 धावांचे आव्हान होते. यावेळी स्मृती मंधाना (90) आणि कर्णधार मिताली राज (63) यांच्या नाबाद अर्धशतकीय खेळीमुळे 35.2 षटकांमध्ये 166 धावा काढल्या.

भारतासाठी झूलन गोस्वामीने सर्वात जास्त तीन विकेट्स घेतल्या. तर एकता बिष्ट, दिप्ती शर्मा आणि पूनम यादवने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात स्मृती मंधानाला तिच्या उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *