शाओमीचे संस्थापक तब्बल 6 हजार 631 कोटींचा बोनस दान करणार!

शाओमीचे संस्थापक तब्बल 6 हजार 631 कोटींचा बोनस दान करणार!

मुंबई : चीनची लोकप्रिय कंपनी शाओमीचे संस्थापक आणि संचालक ले जून यांना त्यांच्या कंपनीकडून काही शेअर्स बोनस मिळाले आहेत. जून हे सर्व शेअर्स दान करणार आहेत. जून यांना 96.1 कोटी डॉलर म्हणजेच 6,631 कोटी किंमत असलेले तब्बल 63.66 कोटी शेअर्स बोनस म्हणून मिळाले आहेत. कंपनीने याबाबतची माहिती दिली. हे सर्व शेअर्स जून दान करणार आहेत. आता हे शेअर्स जून ज्या कुणालाही दान करतील त्याचं नशीब चमकणार हे नक्की.

गेल्या वर्षी चीनमध्ये शाओमीचे कमी स्मार्टफोन विकले गेले. त्यामुळे कंपनीचे शेअर्सही घसरले. बाजारात सॅमसंग, अॅप्पल, हुवाई, ओप्पो, विवो या कंपन्यांचे स्मार्टफोन्स शाओमीला चांगलीच टक्कर देत होते. शाओमी कंपनीला आता 10 वर्षे झालीत. या वर्षात शाओमीने ग्राहकांच्या गरजेनुसार कमी किंमतीत अधिक फीचर्स असलेला स्मार्टफोन देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कंपनी यशस्वीही ठरली. आज शाओमी जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक आहे. 2018 मध्ये शाओमी जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी ठरली. गेल्या वर्षी शाओमीची स्मार्टफोन विक्री 32.2 टक्क्यांनी वाढली होती.

शेअर्स घसरले असले तरीही जून यांची सध्याची संपत्ती जवळपास 75,900 कोटी रुपये आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार जगातील 500 श्रीमंतांच्या यादीत जून यांचा 126 वा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी शाओमीने हॉन्गकॉन्गच्या शेअर बाजारातही एन्ट्री घेतली होती. हॉन्गकॉन्ग शेअर बाजार हे आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाचं स्टॉक एक्स्चेंज सेंटर आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *