फेसबुकच्या हजारो युझर्सचे पर्सनल मेसेज आणि डेटा विकल्याचा दावा

फेसबुकच्या हजारो युझर्सचे पर्सनल मेसेज आणि डेटा विकल्याचा दावा

मुंबई : फेसबुकच्या एकूण 81 हजार युझर्सचा डेटा चोरी केल्याचा दावा करण्यात आलाय. बीबीसीच्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून डेटा हॅकिंग आणि डेटा चोरीमुळे चर्चेत असलेल्या फेसबुकची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, युझर्सचा पर्सनल डेटा म्हणजे मेसेजेस वगैरे विकण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलंय.

सप्टेंबर महिन्यात हा प्रकार समोर आला होता जेव्हा, FBSaler या युझरने इंटरनेटवर दावा केला होता, की तो जवळपास 12 कोटी युझर्सना डेटा विकत आहे. त्यानंतर सायबर सिक्युरिटी कंपनी शॅडोजने या प्रकाराची पडताळणी केली. या पडताळणीतून समोर आलं, की 81 हजार युझर्सचे पर्सनल मेसेज विकले जात होते.

बीबीसी रशियाने पाच अशा युझर्सशी संपर्क साधला, ज्यांचे मेसेज विकले जात होते. विकले जाणारे मेसेज खरे होते, हे या युझर्सशी संपर्क साधल्यानंतर सिद्ध झालं. या मेसेजमध्ये फक्त टेक्स्टच नव्हे, तर पर्सनल फोटोही होते. मालवेअर वेबसाईट्स आणि ब्राऊजर एक्सटेंशनसाठी हे मेसेज विकले जाऊ शकतात, असं वृत्तात म्हटलंय.

ज्या युझर्सचे मेसेज विकले गेलेत, ते जास्तीत जास्त युक्रेन, रशिया याशिवाय इंग्लंड, अमेरिका, ब्राझील आणि इतर देशांमधील आहेत.

या वृत्तानुसार, हॅकर्सने प्रति मेसेज साडे सहा रुपये या दराने मेसेज विकले. ज्या वेबसाईटवर डेटा विक्रीसाठी पब्लिश करण्यात आला, ती वेबसाईट सेंट पीटर्सबर्गमधील असल्याचं बोललं जातं.

फेसबुकचं स्पष्टीकरण

फेसबुकने या वृत्ताचं खंडन केलं आहे. कंपनीने ब्राऊजर एक्सटेंशन निर्मात्यांशी संपर्क साधला आहे. स्टोरीजमध्ये कोणत्याही प्रकारचे मालवेअर एक्सटेंशन्स डाऊनलोडसाठी उपलब्ध नसावेत, अशी सूचना निर्मात्यांशी संपर्क साधून दिली असल्याचं फेसबुकने बीबीसीसोबत बोलताना सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI