फेसबुकचं अध्यक्षपद सोडण्यासाठी मार्क झुकरबर्गवर दबाव?

  • Updated On - 5:00 pm, Fri, 5 July 19 Edited By:
फेसबुकचं अध्यक्षपद सोडण्यासाठी मार्क झुकरबर्गवर दबाव?

वॉशिंग्टन : फेसबुकचे संस्थापक आणि चेअरमन मार्क झुकरबर्ग यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव वाढत आहे. कंपनीच्या गुंतवणूकदारांनी हा दबाव टाकल्याचं काही वृत्तांमध्ये म्हटलं आहे. या वृत्तांनुसार, फेसबुकने एका अशा पीआर फर्मला हायर केलं, ज्या कंपनीकडून प्रतिस्पर्धी आणि टीकाकारांविरोधात सोशल मीडियावर बातम्या पसरवल्या जायच्या. या बातम्यांमध्ये फेसबुकच्या टीकाकारांना यहुदी धर्मविरोधी म्हटलं जायचं.

हे वृत्त समोर आल्यानंतर फेसबुकमध्ये मोठी भागीदारी असणारे जोनस क्रोन यांनी मार्क झुकरबर्ग यांची भेट घेतली. पद सोडण्यासाठी त्यांनी मार्क झुकरबर्गकडे आग्रह केल्याचं बोललं जात आहे. जोनस क्रोन यांच्या मते, फेसबुक ही एक कंपनी आहे आणि कंपनीत सीईओ आणि चेअरमनपद वेगवेगळ्या व्यक्तींकडे असणं गरजेचं आहे.

अमेरिकन वृत्तपत्रांच्या मते, फेसबुकने स्वतःच्या प्रचारासाठी एका पीआर कंपनीला हायर केलं होतं. या कंपनीने फेसबुकवर टीका करणाऱ्यांविरोधात खालच्या पातळीवर जाऊन बातम्या व्हायरल केल्याचं बोललं जात आहे. मार्क झुकरबर्ग यांनी आपल्याला या कंपनीबाबत अगोदरपासूनच माहिती होती, या वृत्ताचं खंडन केलं आहे.

वृत्त समोर आल्यानंतर टीमकडून याबाबत माहिती मागवण्यात आली आणि आता त्या कंपनीची सेवा बंद करण्यात आली आहे, अशी माहिती झुकरबर्ग यांनी दिली. या कंपनीबाबत माहिती असल्याचं खंडन फेसबुकच्या सीओओनेही केलं आहे.

डेटा हॅकिंग असो किंवा डेटाची विक्री, फेसबुक गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच लाखो ग्राहकांचा डेटा हॅक केल्यानंतर फेसबुकची अडचण वाढली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नवं प्रकरण समोर आलं आहे.