एका व्यक्तीच्या नावावर किती बँक खाती असावीत? RBI चा नियम काय सांगतो?

एका व्यक्तीच्या नावावर किती बँक खाती असावीत? जाणून घ्या याबद्दलचे आरबीआयचे नियम आणि एकापेक्षा जास्त बचत खाती (Savings Account) असण्यामुळे होणारे आर्थिक नुकसान आणि तोटे.

एका व्यक्तीच्या नावावर किती बँक खाती असावीत? RBI चा नियम काय सांगतो?
bank ac
| Updated on: Jun 09, 2026 | 1:52 PM

हल्लीच्या डिजीटल युगात बँक खाते उघडणे अत्यंत सोपे झाले आहे. डिजीटल इंडियाच्या प्रभावामुळे आता घरात बसून अवघ्या काही मिनिटांत नवीन खाते उघडता येते. याच कारणामुळे आजकाल बहुतांश लोकांकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असल्याचे पाहायला मिळते. पण एका व्यक्तीच्या नावावर नक्की किती खाती असू शकतात? असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. तसेच जास्त खाती असणे फायदेशीर आहे की तोट्याचे? आज आपण त्याबद्दलचे नियम जाणून घेऊया.

RBI चा नियम काय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) किंवा केंद्र सरकारने एका व्यक्तीने किती बँक खाती उघडावीत, यावर कोणतीही कायदेशीर मर्यादा घातलेली नाही. म्हणजेच, कोणतीही व्यक्ती आपल्या गरजेनुसार कितीही बँकांमध्ये अमर्याद खाती उघडू शकते. मात्र आर्थिक आणि बँकिंग तज्ज्ञांच्या मते, एका सामान्य व्यक्तीसाठी २ ते ३ बँक खाती असणे आदर्श मानले जाते.

यातील पहिले खाते पगार (Salary) किंवा मुख्य व्यवसायातील व्यवहारांसाठी असावे. दुसरे खाते गुंतवणूक किंवा घरगुती खर्चाचे नियोजन करण्यासाठी असावे आणि तिसरे अकाऊंट आपत्कालीन निधी (Emergency Fund) किंवा दीर्घकालीन बचतीसाठी असावे. जरी सरकार खाती उघडण्यावर बंधन घालत नसले, तरी जास्त खाती असणे डोकेदुखी ठरू शकते.

किमान शिल्लक (Minimum Balance) राखण्याची कसरत

आजकाल प्रत्येक व्यावसायिक आणि खाजगी बँकेत ठराविक किमान शिल्लक (Minimum Balance) ठेवणे अनिवार्य आहे. जर तुमची ५-६ खाती असतील आणि तुम्ही त्यात आवश्यक रक्कम ठेवू शकला नाहीत, तर बँक मोठा दंड आकारते. यामुळे तुमचे पैसे विनाकारण कापले जातात.

सुप्त किंवा निष्क्रिय खाती (Dormant Accounts)

अनेक खाती असल्यास सर्व खात्यांवर नियमित लक्ष ठेवणे शक्य होत नाही. जर एखाद्या खात्यातून सलग २ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झाला नाही, तर बँक ते खाते निष्क्रिय (Dormant) घोषित करते. अशा खात्यांचा गैरवापर किंवा सायबर फसवणुकीचा धोका जास्त असतो.

वार्षिक आणि छुपे शुल्क

प्रत्येक बँक खात्यासोबत मिळणाऱ्या डेबिट कार्डचे (ATM) वार्षिक मेंटेनन्स शुल्क, एसएमएस (SMS) अलर्ट शुल्क आणि इतर छुपे चार्जेस दरवर्षी द्यावे लागतात. जितकी जास्त खाती, तितका तुमच्या खिशावर बोजा वाढतो.

आयटीआर (ITR) भरताना अडचण

आयकर परतावा (Income Tax Return) भरताना तुम्हाला तुमच्या सर्व बँक खात्यांची आणि त्यातून मिळणाऱ्या व्याजाची अचूक माहिती द्यावी लागती. खाती जास्त असल्यास कागदपत्रांचा गोंधळ उडण्याची तसेच कराचा हिशोब चुकण्याची शक्यता वाढते. थोडक्यात काय तर, बँकिंग सेवा सोपी झाली असली तरी आर्थिक नियोजनासाठी मर्यादित खाती ठेवणेच शहाणपणाचे असते.

Follow Us