Inflation : आता ब्रेड, बिस्किट, स्नॅक्सचीही किंमत वाढणार; जाणून घ्या भाववाढीची कारणे

Inflation : आता ब्रेड, बिस्किट, स्नॅक्सचीही किंमत वाढणार; जाणून घ्या भाववाढीची कारणे

येत्या काही दिवसांत ब्रेड, बिस्किट आणि स्नॅक्सच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. गव्हाचे दर वाढल्याने या सर्वच पदार्थांचे दर वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अजय देशपांडे

|

May 13, 2022 | 5:30 AM

मुंबई : येत्या काही दिवसांत ब्रेड (Bread), बिस्किट आणि स्नॅक्सच्या किंमतीत वाढ झाली तर आश्चर्यचकित होवू नका. मिठाईवालासुद्धा कचोरी, समोसे आणि भटोरेची किमत कशी वाढवावी किंवा आकार कमी करता येईल का या विचारात आहे. या सर्व गोष्टी महाग (Expensive) होण्यामागे गव्हाच्या पिठाचे (wheat flour) वाढते दर हे कारण आहे. सोमवारी मुंबईत एक किलो पिठाचा भाव 49 रुपयांपर्यंत पोहचला. देशातील अन्य बाजारातही भाव वाढत आहेत. ब्रेड, बिस्किट, कचोरी पिठापासून तयार होतात आणि गव्हाचा पिठाचा दर दीर्घकाळ तेजीत राहणार आहे. यापूर्वी गहू किंवा पिठाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर सरकारी साठ्यातून खुल्या बाजारात गव्हाचा पुरवठा केला जायचा. मात्र गेल्या काही वर्षांपासून गव्हाचे उत्पन्न भरघोस होत आहे. तसेच किमती देखील नियंत्रणात होत्या, त्यामुळे सरकारी साठ्यातून खुल्या बाजारात गव्हाचा पुरवठा झाला नाही. मात्र यंदा गव्हाचे भाव कडाडल्याने सरकारी गोदामातून गव्हाचा पुरवठा बाजारात होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गव्हाच्या उत्पादनात घटीचा अंदाज

सरकारचे गोदाम पूर्ण भरल्यानंतरच खुल्या बाजारात गव्हाचा पुरवठा केला जाऊ शकतो. या वर्षी गव्हाचे उत्पादन आणि सरकारी खरेदीची आकडेवारी पाहता हे शक्य दिसत नाही. यंदा सरकारनं गव्हाचे उत्पादन 11.3 कोटी टनाहून कमी होऊन 10.5 कोटी टन एवढेच होणार असल्याची माहिती दिलीये. जुना साठा आणि या वर्षीची गहू खरेदीची आकडेवारी एकत्रित केली तरीही ती आकडेवारी गेल्या पाच वर्षांपेक्षा कमी आहे. म्हणजेच आता सरकारकडे 310 लाख टन एवढा गव्हाचा साठा शिल्लक आहे. केंद्रीय साठ्यातील गव्हाचा वापर अन्न सुरक्षा आणि पंतप्रधान गरीब कल्याण सारख्या सरकारी योजनेत पुरवठा करण्यासाठी होतो. तसेच सुरक्षा दलालाही गव्हाचा पुरवठा करण्यात येतो. आपत्तीकालिन वापरासाठीही गव्हाचा साठा ठेवावा लागतो. संपूर्ण गरज पूर्ण केल्यानंतर खुल्या बाजारात विक्रीसाठी सरकारकडे खूप कमी गव्हाचा साठा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे यंदा गव्हाचे भाव गगनाला भिडणार आहेत. गव्हाचे भाव वाढल्यास गव्हापासून बनणाऱ्या प्रत्येक पदार्थाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

विक्रमी निर्यातीचे उद्दिष्ट

गेल्या वर्षी 78 लाख टन रिकॉर्ड ब्रेक गव्हाची निर्यात झाल्यानंतर यंदा सरकारनं 100 लाख टन गहू निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलंय. गव्हाची एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्यात झाल्यास देशांतर्गत बाजारात गव्हाची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळेच ब्रेड, बिस्किट आणि पिठाच्या दरात वाढ होऊ शकते. गरज पडल्यानंतर खुल्या बाजारात येणारा गहू निर्यातीमुळे कमी होणार आहे. दुसरीकडे भरीस भर म्हणजे सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेन हे गव्हाची निर्यात करणारे दोन मोठे देश आहेत. युद्धामुळे या देशातील होणारी गव्हाची निर्यात ठप्प झाल्याने जगात भारतात उत्पादित होणाऱ्या गव्हाला मागणी वाढणार आहे. गव्हाच्या मागणीत वाढ झाल्यास दरामध्ये देखील वाढ होऊ शकते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें