बीडच्या साक्षाळ पिंपरी गावालगत असलेला नारायणगड साठवण तलाव पाण्याने भरलेला आहे. पण तरीही शेतकऱ्यांच्या शेतात मात्र पाण्याचा थेंबही पोहोचत नाही. या घटनेने संतप्त असलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पाटबंधारे विभागाच्या दारातच अर्धनग्न आंदोलन केले आहे. रब्बी हंगामात मोठ्या कष्टाने घेतलेली पिके आता हातातोंडाशी आली असताना कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. वारंवार निवेदने करूनही जलसंपदा विभागाचे अधिकारी मात्र कसलीच भूमिका घेत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट जलसंपदा कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला.