आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता भारतातील उद्योग-व्यवसायांवर उमटू लागले आहेत. भंडारा जिल्ह्यातील तांदूळ निर्यातीवर त्याचा थेट परिणाम झाला असून अनेक राईस मिल चालक अडचणीत सापडले आहेत. आखाती देशांमध्ये तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत असते; मात्र सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे निर्यात प्रक्रिया जवळपास ठप्प झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक राईस मिलमध्ये उत्पादन कमी करण्यात आले आहे. काही ठिकाणी कामगारांची कपातही करण्यात आली असून अनेक कामगारांसमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी, व्यापारी आणि राईस मिल उद्योग यांच्यावर या परिस्थितीचा आर्थिक फटका बसत असून युद्धस्थिती लवकर निवळावी, अशी अपेक्षा संबंधितांकडून व्यक्त केली जात आहे.