भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील परसवाडा (देव्हाडी) येथे 22 वर्षांपासून बंद असलेली नळ पाणीपुरवठा योजना आजही गावकऱ्यांच्या पोटात पाणी नव्हे तर डोळ्यात अश्रू आणते. भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना हाल सोसावे लागत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले. शासनाकडे निधी नसल्याचे कारण देत योजना बंद ठेवण्यात आली होती. या परिस्थितीला कंटाळून गावाचे उपसरपंच पवन खवास यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच गावात भीक मागून पैसा जमा केला. तो थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना देत, “हे पैसे घ्या पण आमच्या गावाला पाणी द्या” अशी भावनिक विनंती केली.