बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी माकडाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी तिच्यासोबत एक जिवंत पिल्लू सुद्धा होते. हे पिल्लू वन विभागाने सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले होते. हे पिल्लू देखील जखमी झाले होते, त्याच्यावर लोणार येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, या पिल्लाची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय झाला. मात्र या काही दिवसाच्या पिल्लाला माकडांचा इतर कळप स्वीकारेल का? याबाबतीत शंका उपस्थित होत होत्या. परंतु वन विभागाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवत स्तनदा मादी असलेला माकडाचा एक कळप हेरला. या पिल्लाला कळपाजवळ सोडले. काही वेळातच अगदी काही दिवसांच्या या पिल्लाला पाहून कळपातील स्तनदा मादी माकडाचे मातृत्व जागृत झाले आणि तिने ताबडतोब या पिल्लाला आपल्या कुशीत घेतले आहे.