बुलढाणा जिल्ह्यातून एक थरारक बातमी समोर आली आहे. काच नदीत अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अडकलेल्या चार शेतकऱ्यांना गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे जीवनदान मिळाले. दूरवर नदीक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा अंदाज आला होता, त्यामुळे शेतातली कामे लवकर आटोपून ते ट्रॅक्टरने वेगाने घराकडे परतत होते. मात्र, गावाकडे जाण्याचा रस्ता नदीपात्रातून असल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागला. जसा ट्रॅक्टर नदीपात्रात उतरवला, तसा अचानक पाण्याचा मोठा लोंढा आला आणि ट्रॅक्टरसह सर्वजण पुरात अडकले. यापैकी एका व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत तातडीने गावात फोन करून मदतीची याचना केली. घटनेची माहिती मिळताच गावातील काही लोक तात्काळ धावून आले आणि त्यांनी अडकलेल्या चौघांना यशस्वीरित्या रेस्क्यू करत त्यांचे प्राण वाचवले.