सध्या लग्नाचे सिझन सुरू आहे. जिकडे पहावे तिकडे अवाजवी खर्च, मोठ्या थाटामाटात जणू लग्न लावण्याची स्पर्धा सुरू आहे. अशातच एका लग्नाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा संदेश दिला जाऊ शकतो, हा विचार कुणी केला नसेल. मात्र, बुलढाणा जिल्ह्यात प्रबोधनात्मक विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारा एक अनोखा विवाह सोहळा पार पडलाय. चिखली तालुक्यातील वरखेड येथील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास उर्फ दासा पाटील कणखर यांनी आपल्या मुलीच्या लग्नात पारंपरिक भेटवस्तूंचा मोह टाळत वऱ्हाडाला साडी- चोळी, टोपी-रुमाल न देता तब्बल तीन लाख रुपयांची ज्ञानरूपी पुस्तकांची भेट दिली. यामध्ये, संत तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी, भारतीय संविधान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि शरद जोशी यांच्या जीवनावर आधारित' अंगारवाटा' अशा पुस्तकांचा समावेश होता..