चिपळूण शहरात आज सकाळी गजबजलेल्या चिंचनाका–बस डेपो मार्गावर दोन मोकाट बैलांमध्ये जोरदार झुंज पाहायला मिळाली. बाजारपेठेकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर अचानक सुरू झालेल्या झुंजीमुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. झुंज थेट रस्त्यावर सुरू असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी हा प्रसंग धोकादायक ठरू शकला असता. सुदैवाने, या मार्गावरील वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत वाहने थांबवली, त्यामुळे मोठा अपघात टळला. अन्यथा मोकाट बैलांची धडक वाहनांना किंवा नागरिकांना बसण्याची शक्यता होती. विशेष म्हणजे तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ या ठिकाणी बैलांची झुंज सुरू होती आणि या काळात वाहतूकही विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे चिपळूण शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून प्रशासनाने यावर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.