बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील 46 परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही, झूम मीटिंग तसेच ड्रोनची नजर राहणार असल्याची माहिती धुळे जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकूण 24 हजार 865 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 100 टक्के परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त तसेच भयमुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूमची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय दक्षता समित्या आणि भरारी पथके यांच्या माध्यमातून परीक्षेतील गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.