कळंबोली येथील घाटी मराठी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. दरवर्षीप्रमाणे मध्यरात्री १२ वाजता १०१ मशालींची मानवंदना देत महाराजांचा पाळणा आणि आरती पार पडली. स्वराज्याचे पहिले चलन असलेल्या ‘सुवर्ण होन’ची ४ फूट उंच आणि ८ फूट लांब प्रतिकृती यंदाचे विशेष आकर्षण ठरली. संघटनेचे अध्यक्ष पंकज सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून ही भव्य प्रतिकृती साकारण्यात आली. १६७४ साली रायगडावर राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जारी केलेल्या सुवर्ण होनची आठवण यानिमित्ताने जागवण्यात आली. ही प्रतिकृती पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली.