अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारं चिखलोली धरण आटलं असून धरणात अतिशय कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळं अंबरनाथ शहरात आता आठवड्यातून तीन दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे. अंबरनाथच्या चिखलोली धरणातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदा तीव्र उन्हाळा आणि पाऊस लांबल्यानं चिखलोली धरणाची पाणीपातळी कमालीची खालावलीये. त्यामुळं उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. एमजेपीने दिलेल्या माहितीनुसार १५ जून २०२६ पासून अंबरनाथ पूर्व भागातील नागरिकांना दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि आवश्यक तेवढाच पाणीसाठा करावा, असे आवाहनही करण्यात करण्यात आलं आहे.