हवामान बदलाचा फटका आता सातपुड्यातील रानमेव्यालाही बसला आहे. नंदुरबारमध्ये चारोळीच्या उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याने आदिवासी कुटुंबांच्या उपजीविकेवर टांगती तलवार आली आहे,सातपुड्याच्या जंगलात सध्या चारोळी वेचणीचा हंगाम सुरू आहे. पौष्टिक आणि महागडी मानली जाणारी चारोळी सध्या 1 हजार 100 ते 1 हजार 200 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. बाजारात मागणी प्रचंड असली, तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे झाडांना फळधारणा कमी झाली आहे. कष्टाने गोळा केलेल्या चारोळीतून घरखर्च भागवणे आता कठीण झाले आहे. त्यातच जंगलतोडीमुळे झाडांची संख्या घटत असल्याने भविष्यातील उत्पन्नाचा स्रोतही धोक्यात आला आहे. या नैसर्गिक साधनसंपत्तीला आता शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.