महाराष्ट्रातील धनगर समाजाचा दरवर्षीचा पारंपरिक स्थलांतराचा प्रवास यंदा पावसाअभावी विस्कळीत झाला आहे. चाऱ्याच्या शोधात बुलढाणा जिल्ह्यातून हजारो मेंढ्या आणि बकऱ्यांसह वाशीम मार्गे हिंगोली जिल्ह्यापर्यंत आलेले धनगर बांधव साधारणतः मे महिन्याच्या उत्तरार्धात पावसाची चाहूल लागताच आपल्या मूळ गावी परतण्यास सुरुवात करतात. मात्र यंदा जुलै महिना अर्धा संपत आला तरी बुलढाणा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने तेथील कुरणे अजूनही हिरवाईने बहरलेली नाहीत. त्यामुळे मेंढ्यांसाठी आवश्यक असलेला नैसर्गिक चारा उपलब्ध होत नसल्याने धनगर बांधवांचा परतीचा प्रवास पूर्णपणे ठप्प झाला आहे.