लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार शेतीमाल लिलावात नव्या व्यापाऱ्याच्या प्रवेशामुळे जुन्या व नव्या व्यापाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. या वादामुळे जुन्या व्यापाऱ्यांनी लिलावातून माघार घेतल्याने धान्य लिलाव पूर्णपणे ठप्प झाले. सकाळपासून धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील लासलगाव येथील कोटमगाव त्रिफुलीवर रस्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.