गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात मागील तीन दिवसापासून रानटी हत्तींच्या हैदोस घालत मोठ्या प्रमाणात उभ्या पिकांचे नुकसान केले आहे. ३० हत्तींच्या कळपाने पाथर गोटा परिसरात प्रचंड नुकसान केले आहे. तोडणीवर आलेल्या 25 ते 30 एकरमधील मका पिकाचे रानटी हत्तींनी नुकसान केले आहे. शेतीतील सौर ऊर्जा कृषी पंप आणि खत औषधी साहित्याचीही नासधूस केली आहे. शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केल्यानंतरही या हत्तींना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. ईश्वर राऊत, श्रावण आठवले या दोन शेतकऱ्यांचे जवळपास ६० युरिया आणि डीएपी बॅगचे नुकसान झाले आहे. एकरी एक लाखापर्यंत नुकसान भरपाई देण्याचाही मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. आरमोरी तालुक्यातील जोगी साखरा, पाथरघोटा, देसाईगंज तालुक्यातील भागात हे रानटी हत्ती सध्या वास्तव्यास आहेत.