राज्यातील गणेशोत्सवाला यावर्षी राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने गणेशभक्तांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. घराघरात आणि सार्वजनिक मंडळात विविध थीमद्वारे बाप्पाचे स्वागत करण्यात येत आहे. गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील जरोदे कुटुंबीयांनी घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून पंढरपूरच्या एकादशी वारीचा देखावा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भक्तीरसात रंगलेला हा देखावा गणेशभक्तांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्र्यंबक जरोदे यांनी गणेशोत्सवाचा हा देखावा तयार करताना यावर्षी बळीराजाला भरघोस उत्पन्न मिळावे अशीही प्रार्थना केली आहे. गणेशभक्ती आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविणारा हा देखावा घरगुती गणेशोत्सवात भक्तिभाव आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम घडवतो आहे..