तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळाला. येथील प्रयोगशील शेतकरी देवेंद्र विनोद चौधरी यांच्या साडेतीन एकर क्षेत्रातील इलायची केळीची बाग वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. चौधरी यांनी मोठ्या कष्टाने ४ हजार झाडांची जोपासना केली होती. मात्र, अचानक आलेल्या वादळामुळे काढणीवर आलेली झाडे मुळासकट उपटून पडल्याने १२ ते १३ लाखांचे रुपयांचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.