मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना दुपारी १२ पर्यंत प्रवेश बंदी असतानाही, वरसावे येथे वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत घोडबंदर गावातून ही अवजड वाहने सर्रास सोडली जात आहेत. विशेष म्हणजे यामध्ये अनधिकृत माती वाहतूक करणाऱ्या डंपरचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून पोलिसांच्या या 'आशीर्वादा'मुळे सर्वसामान्य प्रवाशांना मात्र ट्रॅफिकचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी या भ्रष्ट कारभाराची दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.