सोलापूरात गेल्या 12 वर्षांपासून पत्र्याच्या शेडमध्ये अंगणवाडी भरत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या जीवाशी कसा खेळ सुरु आहे याचे विदारक चित्र समोर आले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकटी येथील अंगणवाडी पत्र्याच्या शेडमध्ये भरवली जात आहे. पत्रे फाटल्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यातही चिमुकल्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे.अंगणवाडीच्या परिसरात साप, उंदीर आणि घुशींचा वावर वाढला आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.उन्हाच्या तीव्र झळा, पावसाळ्यात गळणारे पत्रे आणि थंडीच्या दिवसात होणारा त्रास यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही चिंतेत आहेत. शाळेसाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार जागेची मागणी करूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासन आणि ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून नवीन अंगणवाडी इमारतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.