जळगाव : चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात गेल्या दोन ते तीन दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. आवक घटल्यामुळे कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. प्रतिक्विंटल पाचशे रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत कांद्याला दर मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी नाराज होते. मात्र सध्या बाजार समितीतील कांद्याची आवक कमी झाल्याने दरात उसळी दिसून येत आहे. असे असले तरी कांद्याला आणखी चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.