यवतमाळमधील महागाव परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दत्तोबा टेकडीजवळील शेतशिवारात एका बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार करून ज्वारीच्या दाट पिकातच ठाण मांडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी दाखल झालेल्या वन विभागाच्या रेस्क्यू टीमलाही बिबट्याला पकडण्यात अपयश आले असून, त्यामुळे परिसरात अधिकच दहशत पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी दीपक साहेबराव नरवाडे हे आपल्या शेतात गेले असता, त्यांचा पाळीव कुत्रा मृतावस्थेत आढळला. कुत्र्याची अत्यंत निर्घृणपणे शिकार करण्यात आली होती. यानंतर परिसरात पाहणी केली असता जमिनीवर स्पष्ट बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या, त्यामुळे बिबट्याच्या उपस्थितीचा संशय बळावला.