छत्रपती संभाजीनगर : इसारवाडी शिवारात मोठी पाणीगळती झाल्याची घटना समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. २ हजार ५०० मिमी व्यासाच्या या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह दुरुस्तीचं काम सुरू असतानाच व्हॉल्व्ह अचानक सरकल्याने ही दुर्घटना घडली. या बिघाडामुळे तब्बल दोन तास पाण्याचा प्रचंड अपव्यय झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या तांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.