माथेरानच्या पर्यटनाचा आर्थिक कणा मानली जाणारी नेरळ–माथेरान मिनीट्रेन यंदाच्या पर्यटन हंगामात पर्यटकांची मोठी गर्दी वाहून नेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. अनेक वर्षांनंतर मिनीट्रेनला चांगला प्रतिसाद मिळाल्याने पर्यटन व्यवसायालाही मोठा आधार मिळाला आहे. मात्र या ऐतिहासिक मिनीट्रेनला हेरिटेज दर्जा कधी मिळणार आणि ऑनलाइन तिकीट सेवा पुन्हा कधी सुरू होणार, असा प्रश्न पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेली नेरळ–माथेरान मिनीट्रेन ही सुमारे 21 किलोमीटरचा निसर्गरम्य प्रवास करत तब्बल 220 वळणे घेत माथेरान गाठते. समुद्रसपाटीपासून सुमारे 800 मीटर उंचीवर असलेल्या माथेरानपर्यंतचा हा प्रवास पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो.