धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले गेले. यासोबतच हिवाळ्यात गारव्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात जाणवले. विशेष म्हणजे, जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गारव्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असली, तरी जमिनीत ओलावा टिकून असल्याचे चित्र दिसून येत आहे. या अनुकूल हवामानाचा लाभ घेत जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी टरबूजासह विविध फळपिकांसाठी तयारी सुरू केली आहे. विशेष बाब म्हणजे यंदा शेतकऱ्यांमध्ये मल्चिंग पेपरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळत आहे.