भारतीय क्रिकेट संघात निवड झालेला विदर्भाचा अष्टपैलू खेळाडू हर्ष दुबे याचे नागपुरात आल्यावर त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पुढच्या महिन्यात अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी आणि तीन सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेसाठी हर्ष दुबेचा पहिल्यांदाच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. हैदराबाद संघासोबत आयपीएलचा हंगाम पूर्ण करून हर्ष नागपुरात पोहोचला. यावेळी विमानतळावर कुटुंबीय, मित्र परिवार आणि क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. संघात कुणाची जागा घेण्याचा प्रयत्न नाही, तर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे असा विश्वास हर्ष दुबे याने यावेळी व्यक्त केला.