नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामातील गव्हाच्या कापणीला सध्या वेग आला आहे. मजूर टंचाईमुळे शेतकरी आता आधुनिक यंत्रसामग्रीचा आधार घेत गव्हाची कापणी करताना दिसत आहेत. जिल्ह्यात सरासरी २० हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड केली जाते. रब्बी हंगामात गव्हानंतर हरभरा, मका आणि कांदा ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. सध्या आधुनिक हार्वेस्टरच्या मदतीने अवघ्या वीस मिनिटांत एक एकर गहू काढला जात असून, एका एकरासाठी सोळाशे रुपयांचा खर्च येत आहे. त्यामुळे मजुरांच्या टंचाईमुळे होणारा त्रास कमी झाला असून, वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र दुसरीकडे बाजार समितीत गव्हाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उत्पादन झाले असले तरी योग्य भाव न मिळाल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गव्हाला हमीभाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.