राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथील सीताखाई पॉईंटवर झिप लाइन लाईन वर अडकलेल्या पर्यटकाची सुखरूप सुटका करण्यात आली. तोरणमाळच्या सिताखाई पॉईंटवर असलेल्या 3 हजार 500 फूट खोल दरीवर पर्यटकांच्या साहसी खेळासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या झिप लाईनवर एका पर्यटकाचा थरारक अनुभव घेण्याचा प्रयत्न असतानाच पर्यटक झिप लाईनवरून जात असताना अचानक तांत्रिक अडचणीमुळे तो दरीच्या मध्यभागीच अडकला. यामुळे परिसरात काही काळ मोठा थरार आणि घबराट पसरली होती. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून झिप लाईनच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. अतिशय कौशल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.