नाशिक जिल्हा हा द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखला जातो मात्र गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी तीव्र थंडी व ढगाळ वातावरण याचा थेट परिणाम द्राक्ष बागांवर होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. थंडी आणि वातावरणातील आर्द्रता वाढल्याने द्राक्षांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना फवारण्या व इतर उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून आधीच अडचणीत असलेल्या द्राक्ष उत्पादकांच्या आर्थिक संकटात भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने किमान 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.