नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कातरवाडी शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. शेतकरी शंकर झालटे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास जेरबंद झाला आहे. सकाळी वनविभागाला याची माहिती मिळताच,पथकाने धाव घेत पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला निफाड येथील वन विभागाच्या उद्यानात नेले आहे. दरम्यान या परिसरात आणखी दोन बिबटे असून त्यांनाही जेरबंद करावे अशी मागणी केली आहे. कातरवाडी जवळ असलेल्या प्रसिद्ध थंबच्या डोंगरावर अनेक गिर्यारोहक सुळका सर करण्यासाठी येत असल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ,शेतकऱ्यांनी केली आहे.