एप्रिलच्या मध्यावरच उन्हाच्या तीव्र झळांसोबतच नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गडद सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील प्रमुख २६ धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून सध्या केवळ ४४.३० टक्के साठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या बाष्पी भवनामुळे आणि पाणी वापरामुळे धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून, ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे टँकरवर अवलंबून असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.जिल्ह्यातील अनेक मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील पाणीपातळी २० टक्क्यांच्या खाली गेल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.