लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या बाजार भावात मोठी घसरण झाली सोमवारच्या तुलनेत शुक्रवारी कांद्याच्या दरात तब्बल 400 रुपयांची घसरण झाली असून, यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी सोमवारी कांद्याचे सरासरी बाजारभाव 2200 रुपये प्रति क्विंटल होते. मात्र, हेच बाजार भाव शुक्रवारी घसरून 1800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत, त्यामुळे कांद्याचे बाजार भाव दोन हजार रुपयांच्या आत आले आहेत. शुक्रवारी बाजार समितीत 1556 वाहनांद्वारे 24 हजार 336 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या लाल कांद्याला कमाल 2390 रुपये, किमान 600 रुपये, तर सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळाला. बाजार भावातील या सततच्या चढ-उतारामुळे उत्पादन खर्च निघेल की नाही, याबाबत शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.