आज परिवर्तनी एकादशी असल्याने विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी आलेल्या भाविकांची रांग मंदिरापासून तब्बल पाच किलोमीटरपर्यंत लांबली आहे. जवळपास एक लाखा पेक्षा जास्त भाविक पंढरीत दाखल झाले असल्याचा अंदाज असून मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंट भाविकांनी फुलून गेले आहे. परिवर्तनी एकादशीचे व्रत केल्याने पापांचा अंत होतो आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे आणि याच श्रद्धेतून दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरात दाखल होत असल्याने मंदिर समिती आणि प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे.