नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागाच्या विकासाचे दावे केले जात असले, तरी जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. देलबारी परिसरातील बारीपाडा येथे गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर मदतीसाठी 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.त्यातच गावापर्यंत पक्का रस्ता आणि पूल नसल्याने रुग्णवाहिकाही पोहोचू शकत नव्हती. अखेर ग्रामस्थांनी बांबूची झोळी तयार करून गरोदर महिला उषा तडवी यांना उपचारासाठी खांद्यावरून उचलून जवळपास पाच किलोमीटरच्या प्रवास करायला सुरुवात केली मात्र, पक्क्या रस्त्यावर पोहोचण्याआधीच वाटेत महिलेची प्रसूती झाली. ग्रामस्थांच्या मदतीने आई आणि नवजात बाळाला पुढील उपचारासाठी पिंपळखुटा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, सध्या माता आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती आहे.