परळी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथे महाशिवरात्री महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ देवस्थान देवल कमिटी व प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी व्यापक तयारी करण्यात येत आहे. वैद्यनाथ मंदिराच्या उत्तर बाजूस भव्य मंडप उभारण्यात येत असून येथे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना तात्काळ दर्शन मिळावे यासाठी पास प्रणालीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.