पुण्याच्या राजगड तालुक्यातील दुर्गम डोंगरी भाग असलेल्या मेटपिलावरे गावाच्या हद्दीतील कोंढाळकरवाडी,धनगर वस्तीतील ग्रामस्थांना, ओढ्या वरील जुन्या लाकडाच्या तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या साकवावरून जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागतोय. आद्याप ह्या वस्त्यांकडे जाण्यासाठी ओढ्यावर बारमाही पुल आणि रस्ता केला नसल्याने, स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ओढे, नदी, नाले हे दुथडी भरून वाहत आहेत, अशातच खोपडेवाडी, कोंढाळकरवाडी, धनगरवस्ती या वाड्या वस्त्यांना ये-जा करण्यासाठी पक्का पुल नसल्यानं, जीव धोक्यात घालून ओढा ओलांडावा लागतोय. शेतीच्या कामासाठी तसेच इतर महत्वाच्या कामासाठी जीव धोक्यात घालून ओढा ओलांडावा लागत आहे . कुजलेल्या लाकडाच्या साकवरून जीव मुठीत धरून मजुर,शेतकऱ्यांना शेतीची अवजारे वाहुन न्यावी लागत आहेत त्यामुळे मोठ्या दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. लाकडी, तात्पुरता पुल असल्याने तो कधीही तुटून पडू शकतो. लाकडी साकवारुन मृत्यूशी झुंज देत स्थानिकांना प्रवास करावा लागतोय. ये - जा करण्यासाठी कायमस्वरूपी पूल बांधण्याची स्थानिकांची मागणी आहे.