शिरूर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, आता वनविभागाने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. जुन्नर वनविभागाअंतर्गत येणाऱ्या शिरूर वनपरिक्षेत्राकडून पिंपरी दुमाला येथे एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित विशेष कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे बिबट्याची हालचाल ओळखून तात्काळ इशारा देतात, ज्यामुळे संभाव्य धोका आधीच ओळखणे शक्य होत आहे. कॅमेर्यांमधून मिळणारी माहिती थेट वनविभागाच्या नियंत्रण कक्षात पोहोचत असल्याने बिबट्या दिसताच पथक त्वरित घटनास्थळी पोहोचून आवश्यक कारवाई करू शकते. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला मोठा आधार मिळत आहे.