अहिल्यानगर जिल्ह्यात चालू रब्बी हंगामात पेरणी जवळपास अंतिम टप्प्यात आली असून आतापर्यंत ९६.२७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ४ लाख ४१ हजार ६५७ हेक्टर असून यावर्षी आतापर्यंत ४ लाख ३२ हजार ८९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षी रब्बी पेरणी ९७.१८ टक्के झाली होती, त्या तुलनेत यंदा एकूण रब्बी पेरणीत घट नोंदवली गेली आहे. जिल्ह्यात ज्वारी, गहू, मका, इतर तृणधान्ये, करडई, जवस, तीळ, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये गहू पिकाचे क्षेत्र सर्वाधिक असून सरासरीच्या तुलनेत ज्वारी पिकाची पेरणी समाधानकारक झाल्याचे चित्र आहे. मागील वर्षी ज्वारीची पेरणी ७१.१८ टक्के होती. एकूणच गव्हाचे क्षेत्र वाढले असले तरी रब्बी पिकांच्या एकूण पेरणी क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.