रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ढोकशेत आदिवासी वाडीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात नळयोजना अस्तित्वात असली तरी नळांना पाणीच नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना अक्षरशः वणवण भटकंती करावी लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. गावातील नळांना केवळ तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत या वाडीत एकाही पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आलेली नाही अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षांनी पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात ढोकशेत आदिवासी वाडीत अद्याप टँकर पोहोचलेला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत तातडीने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे.