आभाळाने साथ सोडली, जमिनीनेही तहान मांडली. तरीही शेतकऱ्याने जिद्दीने मिरचीची शेती फुलवली. घामाचे थेंब शिंपडून पिकवलेल्या लाल मिरचीला आता कुठे चांगला भाव मिळू लागला आहे. नंदुरबारच्या बाजारपेठेत ओल्या लाल मिरचीला तब्बल साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विक्रमी दर मिळत आहेत. राज्यातील प्रमुख मिरची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील मिरचीची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे.