वाशिम जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्यांनीही खरीप पेरण्यांना वेग दिला. मात्र या पावसाचा धरणे आणि सिंचन प्रकल्पांवरील परिणाम अपेक्षेप्रमाणे दिसून आलेला नाही. जिल्ह्यातील दोन मध्यम आणि तब्बल १६० लघु सिंचन प्रकल्पांमध्ये अद्यापही पाणीसाठा अत्यल्प आहे. दोन मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ६.६ टक्के, तर सर्व प्रकल्पांमध्ये मिळून अवघा ९.६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.