भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात हसारा–खापा मार्गावरील शेतशिवारात वाघीण बछड्यासह दिसल्याची अफवा पसरताच परिसरात भीती आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. परिणामी काही काळ वाहतूक ठप्प झाली. मात्र वनविभागाने तातडीने पाहणी करून व्हायरल व्हिडिओतील प्राणी वाघासारखा दिसत नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे आणि वन्यप्राण्यांबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.