पैठण नगरीत नाथ षष्ठी महोत्सवानिमित्त भक्तीचा अद्भुत सोहळा पाहायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विश्वशांतीचा संदेश देणारे ‘पसायदान’ तब्बल पाच लाख वारकऱ्यांनी एकाच वेळी सामूहिकरित्या गाऊन एक अनोखा जागतिक विक्रम नोंदवला आहे. या ऐतिहासिक क्षणाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली असून पैठणच्या भूमीतून जगाला शांततेचा संदेश देणारा हा सोहळा ठरला. नाथ षष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमात टाळ-मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात लाखो वारकरी,नाथभक्त आणि भाविक एकत्र आले होते.