सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शहरात नागरिकांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होण्याचे प्रकार वाढल्याने त्रस्त झालेल्या शिराळावासीयांनी आज थेट नगरपालिकेवरच अनोखा मोर्चा काढत आपला निषेध नोंदवला. कुत्र्याचे प्रतिकात्मक टेडी घेऊन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. हे टेडी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेट स्वरूपात देऊन शहरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याविरोधात करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची सध्या शिराळा तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून, या आंदोलनाची दखल घेऊन तरी प्रशासनाला जाग येईल का, असा सवाल आता आंदोलनकर्ते विचारत आहेत.