सांगलीच्या तासगावमध्ये ऐतिहासिक रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मानाच्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना अभूतपूर्व जल्लोषात निरोप देण्यात आला.गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात हा रथोत्सव सोहळा संपन्न झाला. रथोत्सव सोहळ्याचे यंदाचे 247 वर्ष असून यानिमित्ताने हजारो गणेश भक्तांनी तासगाव नगरीत उपस्थिती लावली होती. पाच मजली लाकडी रथातून तासगाव नगरीच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्याची ही अनोखी परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा तासगावकर आणि गणेशभक्त मोठ्या उत्साहात जोपासत आहेत. रथोत्सव सोहळ्याला पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, माजी खासदार संजयकाका पाटील आणि आमदार रोहित पाटील यांनी उपस्थिती लावत गणरायाला वंदन केले.